अमरावतीच्या कोणार्क कॉलनीत रानडुकरांमुळे भीतीचे वातावरण
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.) ।शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात रानडुकरांचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा
कोणार्क कॉलनीत पुन्हा रानडुकराची एन्ट्री रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण, मध्यरात्री १५ ते २० कुत्र्यांचा पाठलाग


अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.) ।शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात रानडुकरांचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः यापूर्वी शहरातील रानडुकराच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने कोणार्क कॉलनीतील याप्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

कोणार्क कॉलनी येथील रहिवासी नऊ सप्टेंबर रोजी रात्री सव्वावाजता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बाहेर आले असता भल्यामोठ्या रानडुकराचा १५-२० कुत्रे पाठलाग करीत असल्याचे आढळून आले. गत एक आठवड्यापासून दररोज मध्यरात्री कुत्रे भुंकत असल्याने काल मुद्दाम बाहेर येऊन बघितले असता त्यांना प्रत्यक्ष रानडुकराचा संचार असल्याचे दिसले. यापूर्वी २४ जून २०२६ रोजी नजीकच्या आशियाड कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. त्यात गोविंद पिंजरकर या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

याच कालावधीत या परिसरात कॉटन ग्रीन कॉलनीत एका वासरावर व एका महिलेच्या अंगावर डुक्कर धावल्याची घटना चर्चेत आली होती. गोविंद पिंजरकर यांच्या रानडुकराच्या हल्ल्यातील मृत्यूनंतर येथील मोठ्या नाल्यावरील सुरक्षाभिंतीच्या बांधकामाच्या मागणीने जोर धरला होता. या परिसरातील नाली सफाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.वनविभागाशी पत्रव्यवहार शहरात रानडुकरांच्या प्रवेशासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांना कल्पना नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता वनविभागाला पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande