
अमरावती, १२ सप्टेंबर (हिं.स.)। डफरिन कांडाच्या सार्वजनिक न झालेल्या अहवालावरून अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असतानाच काँग्रेसच्या आक्रमक नेत्या आणि माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालिसा पठणाचे थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी अचलपूर येथे एका मशिदीसमोर आमदारांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण केले होते. याच मुद्द्यावरून यशोमती ठाकूर यांनी राणांवर निशाणा साधला. शेतकरी आणि बळीराजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली.
“इथे बळीराजा संकटात आहे, शेतकरी मरतोय; पण त्याची कोणालाही पडलेली नाही. यांना फक्त मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणायची आहे,” अशा शब्दांत ठाकूर यांनी नवनीत राणांच्या भूमिकेवर टीका केली.
याचवेळी त्यांनी नवनीत राणा यांना थेट आव्हान देताना, “चला, एक दिवस आपण कॉम्पिटिशनच लावू. नवनीत राणांनी हनुमान चालिसा म्हणावी आणि मी देखील म्हणते,” असे म्हटले. ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, ठाकूर यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. डफरिन कांडाच्या अहवालावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्याचीही जोड मिळाल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
आता यशोमती ठाकूर यांच्या या आव्हानाला नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात, याकडे अमरावतीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी