महिला आशिया कप २०२६ : पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेचा अंतिम फेरीत प्रवेश
दुबई, 12 सप्टेंबर, (हिं.स) महिला आशिया कप २०२६ चा दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सनाने नाबाद ४७ धावा करून संघाला १३० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. प्रत्युत्तरात, श्रीलंकेची ध
श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ


दुबई, 12 सप्टेंबर, (हिं.स) महिला आशिया कप २०२६ चा दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सनाने नाबाद ४७ धावा करून संघाला १३० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. प्रत्युत्तरात, श्रीलंकेची धावसंख्या एके वेळी ३३ धावांवर चार गडी बाद अशी होती. त्यानंतर हर्षिता आणि कविशा यांनी ६७ धावांची भागीदारी करून पाकिस्तानकडून विजय हिरावून घेतला. त्यांच्या खेळीमुळे श्रीलंकेला पुनरागमन करून पाकिस्तानला रोमांचक पद्धतीने पराभूत करता आले आणि भारत व पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याचे चित्रच पालटले. गतविजेत्या श्रीलंकेने आता पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला असून १३ सप्टेंबर रोजी त्यांचा सामना भारताशी होईल.

दुबईमध्ये पाकिस्तान महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. मुनीबा अलीने केवळ दोन धावा केल्या, तर शवाल झुल्फिकारने २४ आणि गुल फिरोज्झाने २१ धावा केल्या. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फातिमा सनाने ३६ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तानच्या महिला संघाने पाच गडी गमावून १३० धावा केल्या. श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

१३१ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि ३३ धावांपर्यंत पोहोचता पोहोचता त्यांचे चार फलंदाज बाद झाले. फातिमाने, जिने फलंदाजीत ४७ धावा केल्या, तिने गोलंदाजीतही सुरुवातीला दोन बळी घेतले. नंतर हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहरी यांनी श्रीलंकेच्या संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. हर्षिता आणि कविशा यांनी मिळून संयम दाखवला आणि पाचव्या विकेटसाठीच्या ६७ धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला सावरण्यास मदत झाली. हर्षिताने ३१ चेंडूंमध्ये दोन चौकारांसह ३६ धावा केल्या, तर कविशाने ३३ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ३३ धावा केल्या. त्यानंतर नीलाक्षिका आणि कौशिनी यांनी उरलेले काम पूर्ण केले. श्रीलंकेने १८.५ षटकांत सहा गडी गमावून १३२ धावा केल्या आणि सात चेंडू शिल्लक असताना चार गडी राखून विजय मिळवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande