
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. ही प्रतिष्ठित मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघातून एक वाईट बातमी समोर आली आहे. फॉर्मात असलेला फलंदाज इशान किशन सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान नवदीप सैनीविरुद्ध फलंदाजी करत असताना एक शॉर्ट बॉल चुकवण्याचा प्रयत्न करत असताना किशनच्या पाठीला दुखापत झाली. तो काही वेळ मैदानावर पाठीवर हात ठेवून बसलेला दिसला. यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
आगामी मालिकेसाठी नवदीप सैनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, तो नेट गोलंदाज म्हणून संघासोबत आहे. त्याने भारतीय संघासाठी टी-२० फॉरमॅटमधील आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २८ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघात परतण्यासाठी संघर्ष करत आहे.
सर्वांचे लक्ष किशनच्या दुखापतीवर आहे. लोक प्रार्थना करत आहेत की या २८ वर्षीय फलंदाजाची दुखापत फार गंभीर नसावी, कारण तो जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने नुकतेच पूर्व विभागाच्या संघाला दुलीप ट्रॉफी २०२६ चे विजेतेपद मिळवून दिले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याची बॅट पूर्ण फॉर्मात होती. त्याने पहिल्या डावात २७० आणि दुसऱ्या डावात ८० धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ईशान किशनने भारतीय संघासाठी एकूण ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या ५५ डावांमध्ये त्याने २९.७७ च्या सरासरीने आणि १४६.३१ च्या स्ट्राइक रेटने १६०८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किशनच्या नावावर एक शतक आणि १२ अर्धशतके आहेत. त्याचे १०३ धावांचे शतक हे एका सामन्यातील त्याचे सर्वोच्च शतक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे