
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
उदगीर शहरातील नवा मोंढा परिसरात चौधरी ट्रेडर्सच्या मालकाला कत्ती व स्प्रेचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली बॅग घेऊन जाण्याच्या सशस्त्र लूटप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. १०० पेक्षा अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून ३२ हजार रुपये रोख, बॅग व संबंधित साहित्य तसेच चोरीची मोटारसायकल असा एकूण ८७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३७८/२०२६, कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. गुन्ह्याच्या पद्धतीशी साधर्म्य असलेल्या गुन्ह्यांतील संशयितांची माहिती संकलित करण्यासोबतच गोपनीय बातमीदारांकडून मिळणाऱ्या माहितीची पडताळणी करण्यात आली.
तपासादरम्यान १०० पेक्षा अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व उपलब्ध माहिती हस्तगत करून त्याचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. आरोपींच्या हालचाली, गुन्ह्याच्या वेळेतील संभाव्य मार्ग, वापरलेले वाहन आणि इतर तांत्रिक बाबींचा परस्पर संबंध तपासण्यात आला. या तपासातून संशयितांच्या हालचालींची पडताळणी करण्यात पोलिसांना यश आले.
१३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेत असताना येरोळमोड परिसरात होते. त्यावेळी मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे उदगीर–नळेगाव रोडवरील करडखेल पाटी येथील एका हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. तेथे विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर तपकिरी रंगाची बॅग घेऊन थांबलेल्या दोन इसमांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे विजय शिवाजी बारहाळे (वय २४), रा. हाळणी, ता. मुखेड, जि. नांदेड आणि गोविंद राजेंद्र अटकळे (वय २१), रा. हाळणी, ता. मुखेड, जि. नांदेड, ह.मु. चांदणी चौक, बावधान, पुणे अशी आहेत.
१०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास, संशयितांची माहिती संकलित करणे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी अशा बहुआयामी तपासातून या गुन्ह्याचा माग काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis