
मुंबई , 13 सप्टेंबर (हि.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, रविवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन शाह यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह आगामी काळातील महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाचा मुद्दाही या चर्चेतील महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय राज्यातील विविध राजकीय घडामोडी आणि प्रशासकीय विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाल्याची माहिती आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्याबाबतही शाह यांनी माहिती घेतल्याचे समजते. दौऱ्यात झालेल्या विविध भेटी आणि चर्चांबाबत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एकाच गाडीतून पुढील कार्यक्रमाकडे
सह्याद्री अतिथीगृहावरील भेटीनंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून पुढील नियोजित कार्यक्रमासाठी फोर्ट परिसरातील एशियाटिक सोसायटीच्या दिशेने प्रवास केला. या प्रवासादरम्यानही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते.
फोर्टमधील द एशियाटिक सोसायटीला भेट देत शाह यांनी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेली शाह–शिंदे भेट आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांचा एकत्रित प्रवास यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीतील चर्चेचे नेमके राजकीय परिणाम काय होतात आणि आगामी काळात कोणते निर्णय समोर येतात, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी