
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासून अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
आज मुंबईकर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप, रस्त्यांवरील सजावट तसेच मूर्ती आणण्याची तयारी सुरू असताना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळांकडून सजावटीचे साहित्य आणि मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीकरांची दीड महिन्यांची प्रतीक्षा संपवत पावसाने शहरात पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत पावसामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहरातही रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. वसई, नालासोपारा आणि विरारमधील अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. गणेशमूर्ती मंडपात आणण्याचे काम सुरू असल्याने पावसामुळे गणेशभक्तांची धावपळ होत आहे. अनेकांनी मूर्ती आणि सजावटीचे साहित्य प्लास्टिकच्या आच्छादनाने झाकण्याची तयारी केली आहे.
दुसरीकडे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी कायम आहे. कोलाड ते इंदापूरदरम्यान सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. सध्या वाहतूक काहीशी कमी असली तरी अनेक ठिकाणी ती संथगतीने सुरू आहे. कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी काही तरुणांनी ठिकठिकाणी मोफत चहा आणि नाश्त्याचे स्टॉल सुरू केले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता असून विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात पावसाचेही आव्हान निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule