सौदी अरेबियावर हुतींचा ड्रोन हल्ला; लष्करी तळाला लक्ष्य केल्याचा दावा
रियाद, 13 सप्टेंबर (हिं.स.)। मध्य-पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. इराण आणि अमेरिकेमधील युद्धाला अनेक महिने उलटले आहेत. त्याचवेळी येमेनमधील हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाला लक्ष्य केले जात आहे. आता हुतींनी सौदी अरेबियातील शर
सौदी अरेबियावर हुतींचा ड्रोन हल्ला; लष्करी तळाला लक्ष्य केल्याचा दावा


रियाद, 13 सप्टेंबर (हिं.स.)। मध्य-पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. इराण आणि अमेरिकेमधील युद्धाला अनेक महिने उलटले आहेत. त्याचवेळी येमेनमधील हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाला लक्ष्य केले जात आहे. आता हुतींनी सौदी अरेबियातील शरूराह येथे ड्रोन हल्ले केले असून, सौदीच्या एका लष्करी तळाला लक्ष्य करून मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे.

रिपोर्टनुसार, हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी टेलिग्रामवर जारी केलेल्या निवेदनातून या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हुतींनी सौदीच्या लष्करी तळावरील शस्त्रसाठा केंद्र आणि कमांड-अँड-कंट्रोल रूमला लक्ष्य केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला.

हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी हा हल्ला अचूकपणे लक्ष्य साधून करण्यात आल्याचा दावा केला. त्यांनी या हल्ल्याला येमेनविरोधात सौदी अरेबियाकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवाईला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे म्हटले. यासोबतच त्यांनी इशारा दिला की, सौदी अरेबियाने हल्ले थांबवले नाहीत, तर आगामी काळात सौदीच्या अंतर्गत भागांमध्ये आणखी घातक हल्ले केले जातील.

सौदीच्या नागरी संरक्षण विभागानेही हुतींच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची पुष्टी केली आहे. सौदीच्या नागरी संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येमेनच्या दिशेने डागण्यात आलेले एक प्रक्षेपास्त्र जिझान येथे कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात स्थानिक मशिदीसह अनेक निवासी इमारती आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

यापूर्वी लाल समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीमध्ये असलेल्या मयून बेटावर येमेनमधील हुतींनी कब्जा केला होता. मोखा बंदर शहरावरील कब्जाच्या प्रत्युत्तरात सौदी अरेबियाने मोखा विमानतळावर जोरदार हल्ले केले.

हुतींनी दावा केला होता की, लाल समुद्रातून तेल आणि गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा मार्ग असलेल्या या भागावर कब्जा करून ते आणि इराण अमेरिकेवर जागतिक ऊर्जा किमती वाढवण्यासाठी दबाव निर्माण करू इच्छित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande