भारत उत्पादनाच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठा लस उत्पादक आणि पुरवठादार - डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली असून उत्पादनाच्या प्रमाणानुसार भारत आता जगातील सर्वात मोठा लस उत्पादक आणि लसींचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार झाला आहे, असे विज्ञान आणि तंत्रज
India World Largest Vaccine Producer Supplier Dr. Jitendra Singh


India World Largest Vaccine Producer Supplier


नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली असून उत्पादनाच्या प्रमाणानुसार भारत आता जगातील सर्वात मोठा लस उत्पादक आणि लसींचा सर्वात मोठा जागतिक पुरवठादार झाला आहे, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. साथीच्या रोगांना तोंड देण्याच्या तयारीत भारताने गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत मोठी प्रगती केली असून, सक्षम जैव-अर्थव्यवस्था उभी केली आहे, असे सिंह यांनी सांगितले. लस विकसित करण्याची भक्कम क्षमता आणि वैज्ञानिक वातावरण भारताने तयार केले आहे, ज्यामुळे भविष्यातील साथीचे आणि महामारीचे आजार रोखण्यासाठीच्या जगाच्या तयारीत भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये 'साथ रोग सज्जता नवोन्मेष आघाडी', अर्थात सीईपीआयच्या संचालक मंडळ आणि गुंतवणूकदार परिषदेच्या उच्चस्तरीय समारंभात डॉ. सिंह बोलत होते. केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि सीईपीआय यांनी संयुक्तपणे हा समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला सीईपीआयचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळ आणि गुंतवणूकदार परिषदेचे सदस्य, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि लस विकास तसेच साथीच्या रोगांसाठीच्या तयारीशी संबंधित इतर प्रतिनिधी उपस्थित होते. नवी दिल्लीमध्ये सीईपीआयच्या संचालक मंडळ आणि गुंतवणूकदार परिषदेच्या बैठका भारतात यापूर्वी झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर तब्बल 10 वर्षांनी होत आहेत. त्यामुळे भारत आणि सीईपीआय यांच्यातील भागीदारी किती बळकट झाली आहे, हे यावरून दिसून येते.

गेल्या 10 वर्षांत भारताने महामारींना तोंड देण्याची तयारी आणि जैवतंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. भारताची जैव-अर्थव्यवस्था 2025 मध्ये 195.3 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली असून, त्यात वर्ष आधारे 18 टक्के वाढ झाली आहे. देशातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 11 हजार 855 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2025 या एका वर्षात 1 हजार 780 नवीन स्टार्टअपची भर पडली. भारताच्या जैव अर्थव्यवस्थेत जैव औषधनिर्मिती क्षेत्राचा वाटा जवळपास 30 टक्के आहे.

लस क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले. यापूर्वी किफायतशीर किमतीत लस तयार करणारा देश अशी भारताची ओळख होती, आता लस संशोधन आणि नवकल्पना, प्रगत जैविक औषधांची निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन अशा सर्वच क्षेत्रांत भारताने आपली क्षमता वाढवली आहे. भारत 100 हून अधिक देशांना लसींचा पुरवठा करतो. जगातील जवळपास 60 टक्के लसी भारतात तयार होतात. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमित लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींपैकी 65 टक्क्यांहून अधिक लसींचा पुरवठा भारत करतो.

कोविड-19 च्या काळातील अनुभव सांगताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, भारताने अतिशय कमी वेळात लसी विकसित केल्या. तसेच, या लसी इतर देशांना आणि भागीदारांना उपलब्ध करून दिल्या. या अनुभवामुळे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमतेबद्दल जगाचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे, असे त्यांनी सांगितले. आता पुढील टप्प्यातील सहकार्य हे या यशाच्या आधारावर पुढे नेण्याची गरज आहे. भारताची वैज्ञानिक क्षमता जगाच्या आरोग्यासाठी अधिक उपयोगी ठरेल, यासाठी तिचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे सिंह यांनी सांगितले. इंड-सीईपीआय( Ind-CEPI ) मोहिमेमुळे भारताची जैववैद्यकीय उपाय विकसित करण्याची क्षमता आणखी बळकट होण्याची अपेक्षा आहे. यासाठी विविध रोगांपासून संरक्षण देणाऱ्या लसी विकसित करणे, प्रगत जैव-उत्पादन क्षमता वाढवणे आणि भारतातील तसेच जगभरातील सहकार्याचे जाळे अधिक बळकट करणे, यावर भर दिला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande