ओसामा बिन लादेनच्या हिटलिस्टमध्ये भारताचाही समावेश; सीआयएच्या गुप्त कागदपत्रांत मोठा खुलासा
नवी दिल्ली , 13 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने नुकतेच जाहीर केलेल्या कागदपत्रांमधून एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन ज्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणू इच्छित होता, त्या देशांच्या याद
ओसामा बिन लादेनच्या हिटलिस्टमध्ये भारताचाही समावेश; सीआयएच्या गुप्त कागदपत्रांत मोठा खुलासा


नवी दिल्ली , 13 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने नुकतेच जाहीर केलेल्या कागदपत्रांमधून एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन ज्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणू इच्छित होता, त्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश करू इच्छित होता. ही माहिती १९९८ मधील एका प्रेसिडेंशियल डेली ब्रीफमधून समोर आली आहे.

सीआयएने शुक्रवारी ओसामा बिन लादेनशी संबंधित ७० हून अधिक प्रेसिडेंशियल इंटेलिजन्स ब्रीफ सार्वजनिक केले. यामध्ये १०० हून अधिक पानांची माहिती आहे. २००१ मधील ९/११ दहशतवादी हल्ल्यांच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त ही कागदपत्रे जाहीर करण्यात आली आहेत. २८ ऑगस्ट १९९८ रोजीच्या एका प्रेसिडेंशियल ब्रीफमध्ये बिन लादेनला अनेक देशांमध्ये हल्ले घडवून आणायचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. यामध्ये भारतासोबतच पाकिस्तान, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, युगांडा आणि संभाव्यतः नायजेरियाचाही उल्लेख आहे. ‘बिन लादेनचे दहशतवादी नेटवर्क अजूनही धोका आहे’ या शीर्षकाच्या या दस्तऐवजातील काही भाग अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. भारताबाबत कोणतेही विशिष्ट ठिकाण, हल्ल्याची तारीख किंवा अचूक ऑपरेशनल प्लॅनची माहिती यात देण्यात आलेली नाही.

दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे की, बिन लादेन आणि अफगाणिस्तानात उपस्थित असलेल्या इतर दहशतवादी नेत्यांविरोधात अमेरिकेने कारवाई करूनही त्यांचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट झाले नव्हते. त्यांची संपर्क व्यवस्था कार्यरत होती आणि काही दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये पुन्हा प्रशिक्षण सुरू झाले होते. अहवालानुसार, अल-कायदाचा प्रमुख अमेरिका आणि ब्रिटनविरोधातही पुढील हल्ले करण्याच्या तयारीत होता. बिन लादेन किमान ६० देशांमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्ती आणि सहयोगी दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कचा वापर हल्ल्यांसाठी करू शकतो, असा अंदाजही या दस्तऐवजात व्यक्त करण्यात आला होता.

सीआयएने जाहीर केलेल्या या प्रेसिडेंशियल ब्रीफमधून हेही समोर येते की, १९९८ ते २००१ या कालावधीत संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. या कागदपत्रांची मालिका बिल क्लिंटन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून सुरू होऊन जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळापर्यंत जाते. सीआयएने याला आपल्या अत्यंत संवेदनशील गुप्तचर सामग्रीबाबत केलेली अभूतपूर्व पारदर्शकता असे म्हटले आहे.

११ सप्टेंबर २००१ रोजी अल-कायदाच्या १९ दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमाने हायजॅक केली होती. त्यापैकी दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर आदळली. या हल्ल्यानंतर दोन्ही इमारती पूर्णपणे कोसळल्या. तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनवर आदळले. चौथे विमान, ज्याचे लक्ष्य व्हाइट हाऊस किंवा अमेरिकेची संसद असावे, असे मानले जाते, प्रवाशांनी केलेल्या प्रतिकारानंतर पेनसिल्व्हेनियातील एका मैदानात कोसळले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande