
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, ब्रिक्सवरील ग्लोबल साउथ देशांचा विश्वास वाढला आहे. याचे कारण म्हणजे येथे त्यांचा आवाज ऐकला जातो आणि त्यांच्या अनुभवांचा आदर केला जातो. इतकेच नाही, तर उपाययोजना त्यांच्यासाठी नव्हे, तर त्यांच्यासोबत मिळून विकसित केल्या जातात. त्यांनी तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांचा शस्त्र म्हणून वापर करण्यावर चिंता व्यक्त केली आणि या संसाधनांच्या सर्वसमावेशक वापराच्या गरजेवर भर दिला.
पंतप्रधानांनी भारत मंडपम येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेतील 'लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता' या सत्रातील आपल्या स्वागतपर भाषणात ही टिप्पणी केली. ते म्हणाले की, ब्रिक्सची ताकद त्याच्या विविधतेत आणि सहकार्यात आहे. त्यामुळे, विविधता ही आपली ओळख, सहकार्य ही आपली प्रेरणा आणि आपल्या प्रगतीचा फायदा संपूर्ण मानवजातीला झाला पाहिजे.ते म्हणाले, आज हे सभागृह विविध खंड, संस्कृती आणि विकासाचे प्रवास एकत्र आणत आहे. हे ब्रिक्सच्या वाढत्या सामर्थ्याचे, आकर्षणाचे आणि अभूतपूर्व विश्वासाचे प्रतीक आहे. मोदी म्हणाले की, ब्रिक्सने चार स्तंभांच्या माध्यमातून सर्वसमावेशक जागतिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सचे सर्व प्रयत्न लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वतता यावर केंद्रित आहेत.
ते म्हणाले, आज जगात तणावांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि सामान्य जीवनावर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होत आहे. जागतिक महामारी, हवामानविषयक आपत्ती आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांनी हे दाखवून दिले आहे की, आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात कोणतेही संकट एकाच प्रदेशापुरते मर्यादित नाही. त्यामुळे, आम्ही ब्रिक्स शिखर परिषदेत लवचिकता वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.
पंतप्रधानांनी माहिती दिली की, संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि प्रतिसादासाठी ब्रिक्सने 'ब्रिक्स एकात्मिक पूर्वसूचना प्रणाली'वर सहमती दर्शवली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वसूचना डेटा एकत्रीकरण मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात आली आहेत. 'ब्रिक्स लॉजिस्टिक्स सप्लाय चेन कोऑपरेशन फ्रेमवर्क' आपल्या पुरवठा साखळ्यांना अधिक विश्वसनीय आणि लवचिक बनविण्यात मदत करेल.
ते पुढे म्हणाले की, आमचे स्टार्टअप्स आणि इनक्यूबेटर्स 'ब्रिक्स इनक्यूबेटर नेटवर्क' अंतर्गत जोडले जातील. नाविन्यपूर्ण आणि विस्तारक्षम उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही 'ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड' प्रस्तावित केला आहे. डिजिटल शेतीवरील ब्रिक्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी एक नवीन पोर्टफोलिओ तयार करेल. याच्या माध्यमातून, एआय, भू-स्थानिक तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडल्या जातील. आम्ही ब्रिक्स कनेक्टच्या माध्यमातून कौशल्ये, रोजगारक्षमता, कार्यबलातील महिला, सामाजिक संरक्षण आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन दिले आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, लघु उद्योगांना ज्ञान, वित्त आणि नवीन बाजारपेठांशी जोडण्यासाठी ब्रिक्स एमएसएमई सहकार्य पोर्टल सुरू करण्यात आले आहे. आपल्या शहरांमध्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी ब्रिक्स अर्बन मोबिलिटी हबची स्थापना करण्यात आली आहे. आम्ही स्मार्ट ग्रिड्स आणि ऊर्जा साठवणुकीसाठी ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती केली आहे. याचा उद्देश आपल्या स्वच्छ ऊर्जा प्रणालींना अधिक विश्वसनीय, कार्यक्षम आणि सुलभ बनविण्यात मदत करणे आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्समध्ये विकसित केलेल्या उपायांचे फायदे ग्लोबल साउथपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे उपाय स्थानिक गरजांनुसार जुळवून घेणे, त्यांना परवडणारे आणि सहज स्वीकारण्यायोग्य बनवणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आपल्या प्रगतीचे फायदे संपूर्ण मानवजातीला मिळाले पाहिजेत.पंतप्रधानांनी विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखण्याच्या गरजेवरही भर दिला. ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत निसर्गाला माता मानले जाते. विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे पर्याय नसून ते एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे, संतुलित विकासाचा मार्ग अवलंबणे अत्यावश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे