कला क्षेत्रातील ‘३६० डिग्री मॅन’ प्रसाद ओक
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा निर्मिती… गायन, कविता, कथालेखन आणि परीक्षकाची जबाबदारी असो… प्रत्येक कलाप्रकाराला आपल्या प्रतिभेची वेगळी ओळख देणारे नाव म्हणजे प्रसाद ओक. कलेच्या विविध वाटांवरून प्रवास करताना प्रत्येक भ
Prasad oak


मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा निर्मिती… गायन, कविता, कथालेखन आणि परीक्षकाची जबाबदारी असो… प्रत्येक कलाप्रकाराला आपल्या प्रतिभेची वेगळी ओळख देणारे नाव म्हणजे प्रसाद ओक.

कलेच्या विविध वाटांवरून प्रवास करताना प्रत्येक भूमिका तितक्याच निष्ठेने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणे साकारत प्रसाद ओक यांनी मनोरंजनविश्वात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या याच बहुआयामी आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा गौरव ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना प्रसाद ओक यांच्या कर्तृत्वाला आणखी एक मानाचा मुजरा मिळाला.

यावेळी प्रसाद ओक यांच्या कलाप्रवासाचं कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख केला तो अगदी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा.

‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन!’

ही केवळ एक उपमा नाही, तर अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत, निर्मितीपासून गायनापर्यंत आणि कवितेपासून कथालेखनापर्यंत त्यांनी गाठलेल्या विविध कलाक्षेत्रांची पोचपावतीच आहे.

एका कलाकाराने स्वतःला केवळ एका चौकटीत न बांधता कलेच्या प्रत्येक माध्यमात स्वतःला सिद्ध करणं, प्रत्येक जबाबदारीला न्याय देणं आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप सोडणं… हीच प्रसाद ओक यांच्या प्रवासाची खरी ओळख.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ‘३६० डिग्री मॅन’ ही कौतुकाची थाप म्हणजे प्रसाद ओक यांच्या आजवरच्या समृद्ध कलाप्रवासावर उमटलेली मानाची मोहोरच म्हणावी लागेल.

अभिनयाच्या पडद्यापासून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यापर्यंत, निर्मितीपासून शब्दांच्या विश्वापर्यंत… प्रसाद ओक म्हणजे कलेचा प्रत्येक कोन अनुभवणारा आणि प्रत्येक कोनातून चमकणारा कलाकार.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande