नंदीग्राममधून लढा, आम्ही उमेदवार देणार नाही; ममता बॅनर्जींना बंडखोर गटाची ऑफर
कोलकाता, 13 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाने पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठी राजकीय
Ritabrata Banerjee Offers Support Mamata Banerjee Nandigram Election


कोलकाता, 13 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाने पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठी राजकीय ऑफर ठेवली आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे बंडखोर नेत्यांनी जाहीर केले आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामची जागा सोडल्यानंतर नियमानुसार या मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांनी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवून पुन्हा विधानसभा गाठावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ऑफरमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांनी विधानसभा सदस्य म्हणून परत यावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. आमच्या गटाने उमेदवार निवडीबाबत सामूहिक निर्णय घेतला आहे. मात्र, त्याच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्यास तयार झाल्यास त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या निवडून याव्यात आणि विधानसभेत दाखल व्हाव्यात, त्यानंतर सर्वांनी मिळून विकासासाठी काम करावे, असेही ऋतब्रत बॅनर्जी यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय टोला लगावला. ममता बॅनर्जी सर्वसाधारण निवडणुकांमध्ये अनेकदा पराभूत होतात; मात्र पोटनिवडणुकीत त्या परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरतात, असे त्यांनी म्हटले. ममता बॅनर्जी आपल्या विधानसभा मतदारसंघात आणि बूथवरच पराभूत झाल्या, हे चांगले चित्र नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

नंदीग्रामचा ममता बॅनर्जी यांच्याशी जुना राजकीय संबंध आहे. २०११ मध्ये डाव्या आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये कृषी जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात त्यांना मोठी राजकीय ताकद मिळाली. मात्र, २०२१च्या विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आणि ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून मुख्यमंत्रीपद कायम ठेवले होते.

दरम्यान, नंदीग्रामसोबत रेजिनगर विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. माजी तृणमूल नेते हुमायून कबीर यांनी राजीनामा दिल्यानंतर रेजिनगरची जागा रिक्त झाली. निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘आम जनता उन्नयन पार्टी’ स्थापन केली होती. त्यांनी नौदा आणि रेजिनगर या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला होता. त्यानंतर नौदा मतदारसंघ स्वतःकडे ठेवत रेजिनगरची जागा सोडली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुकीकडे आता पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande