
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यंदाचा दसरा मेळावा दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अर्थात शिवाजी पार्क येथे होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने ठाकरे गटाला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे पारंपरिक दसरा मेळाव्याच्या आयोजनाचा मार्ग आता मोकळा झाला असून, लवकरच मैदानावर मेळाव्याच्या तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाने यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रितसर अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदानासाठी यंदा ठाकरे गटाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे अन्य कोणताही दावा किंवा अर्ज नसल्याने प्रशासकीय नियमांनुसार महापालिकेने ठाकरे गटाच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. परिणामी, यंदा दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून कोणताही वाद निर्माण झालेला नाही.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मैदानावरील दसरा मेळाव्याच्या आयोजनावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा दावा केल्याने हा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी मैदानाच्या परवानगीवरून मोठा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पाहायला मिळाला होता. तसेच काही अन्य संघटनांनीही मैदानासाठी अर्ज केल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली होती.
यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ठाकरे गटाने नियमानुसार केलेल्या अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणताही अर्ज किंवा दावा प्राप्त न झाल्याने महापालिकेने परवानगी देण्यास विलंब केला नाही. त्यामुळे २० ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाले आहे. या मेळाव्यात ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule