
बीड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील क्रांतीनगर परिसरात घरासमोर खेळत असलेल्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आईला आणि साक्षीदाराला शिवीगाळ करून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची १० वर्षीय मुलगी घरासमोरील रस्त्यावर खेळत असताना
आरोपी शोएब अजीज पठाण तिच्याजवळ आला. त्याने 'माझ्यासोबत चल, तुला चॉकलेट देतो,' असे सांगून वाईट उद्देशाने तिचा हात धरून ओढल्याचा आरोप आहे. तसेच 'रोज तुला चॉकलेट देतो, घरी सांगू नको,' अशी धमकी देत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर तिची आईआरोपीला जाब विचारण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी बिल्कीस अजीज पठाण, जकीया मेहबुब शेख आणि जफर मेहबुब शेख (सर्व रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांनी संगनमत करून फिर्यादी महिला व साक्षीदाराला शिवीगाळ केली. तसेच चापट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, क्रांतीनगर परिसरात दोन दिवसांत अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis