





मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक गणपतीची आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नीचे ‘वर्षा’ येथे स्वागत केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,यांच्या सह कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अमित साटम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यानंतर अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदगिरी’ या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि श्रीमती शाह यांचे ‘नंदगिरी’ येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक आरती करून श्री गणरायाचे दर्शन घेतले.
लालबागच्या राजाचे दर्शन
अमित शहा यांनी आज परळ येथील प्रसिद्ध लालबागचा राजा श्री गणेशाचे कुटुंबीयांसह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शहा, मुलगा जयेश शहा, मुलगी आणि नात उपस्थित होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष सागर गुप्ता आणि मानद सचिव सुधीर साळवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले. मूर्तिकार श्री. संतोष कांबळी यांनी यंदाची श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे.
यानंतर शहा यांनी आज आपल्या कुटुंबीयांसमवेत वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शहा, मुलगा जयेश शहा, मुलगी आणि नात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी