सौदी अरेबियाच्या जिझानमधील जखमी भारतीयांना भारताची सर्वतोपरी मदतीची ग्वाही
जेद्दाहच्या रुग्णालयात उपचार; महावाणिज्यदूत फहद सूरी यांनी घेतली रुग्णांची भेट नवी दिल्ली, १४ सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियातील जिझान येथे अलीकडे घडलेल्या घटनांमध्ये जखमी झालेल्या भारतीय नागरिकांना भारताने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. जखमी
सौदी अरेबियातील जखमी भारतीयांना भारताचे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन


जेद्दाहच्या रुग्णालयात उपचार; महावाणिज्यदूत फहद सूरी यांनी घेतली रुग्णांची भेट

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियातील जिझान येथे अलीकडे घडलेल्या घटनांमध्ये जखमी झालेल्या भारतीय नागरिकांना भारताने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. जखमी भारतीय नागरिकांवर जेद्दाह येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, भारताचे महावाणिज्य दूतावास रुग्णालय प्रशासन, जखमी नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सातत्याने संपर्कात आहे.

जेद्दाह येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने सोमवारी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. भारताचे महावाणिज्यदूत फहद सूरी यांनी जेद्दाह येथील डॉ. सुलेमान फकीह रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेतली. हे नागरिक जिझानमधील अलीकडील घटनांमध्ये जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

महावाणिज्यदूतांनी रुग्णांची प्रकृती आणि त्यांच्या उपचारांची माहिती घेतली. तसेच जखमी भारतीय नागरिकांशी संवाद साधून त्यांना दूतावासाकडून सर्वतोपरी मदत आणि सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली. मात्र, जखमी भारतीय नागरिकांची नेमकी संख्या दूतावासाने जाहीर केलेली नाही.

क्षेपणास्त्र हल्ल्याने वाढला तणाव

दरम्यान, शनिवारी येमेनमधील हौथी बंडखोरांनी डागलेले एक क्षेपणास्त्र सौदी अरेबियातील जिझानच्या अल-तुवाल गव्हर्नरेटमध्ये कोसळले. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, जेद्दाह येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले भारतीय नागरिक याच घटनेत जखमी झाले आहेत का, याची अद्याप भारतीय दूतावासाने पुष्टी केलेली नाही.

सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील भागात अलीकडच्या काही दिवसांत तणाव वाढला आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदीच्या दक्षिणेकडील भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात हौथी बंडखोरांनी अबहा, खमिस मुशैत, जिझान आणि नजरान येथील नागरी तसेच आर्थिक ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह एकूण ७३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत भारतीय दूतावासाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande