
परभणी, १४ सप्टेंबर (हिं.स.)। परभणी शहरातील खंडोबा कॉर्नर परिसरात अवैधरित्या गांजाची वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत १.१० किलो गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडोबा कॉर्नर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित इसमांच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले. दरम्यान, संशयितांकडून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई केली.
झडतीदरम्यान १.१० किलो गांजा तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऑटो जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस हवालदार रणजीत आगळे यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील गांजाचा मूळ स्रोत, पुरवठादार, वाहतूक मार्ग तसेच गांजा तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis