दागिन्यांच्या लालसेपोटी मावशीचा खून; ४० दिवसांनंतर भाच्याला अटक
जळगाव, १४ सप्टेंबर (हिं.स.) : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून ४० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. दागिन्यांच्या लालसेपोटी सख्ख्या भाच्यानेच त्यांचा खून केल्याचे तप
प्रतिकात्मक लोगो


जळगाव, १४ सप्टेंबर (हिं.स.) : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून ४० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. दागिन्यांच्या लालसेपोटी सख्ख्या भाच्यानेच त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजंताबाई माळी या ३ ऑगस्ट रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याने पोलिसांना घातपाताचा संशय होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.

एलसीबीने दोन पथके तयार करून पारोळा, धुळे, अमळनेर, धरणगाव, मुक्ताईनगर, यावल आणि जळगाव परिसरात तपास सुरू केला. सुमारे २५० किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली, तर १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये ३ ऑगस्ट रोजी सकाळी प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्यासोबत दिसून आला. त्यानंतर त्या कारमधून जात असल्याचेही निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.

तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी प्रशांत माळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मोठ्या कर्जामुळे त्रस्त असलेल्या प्रशांतने दागिन्यांच्या लालसेपोटी वैजंताबाईंच्या हत्येचा कट रचला. ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे,’ असे खोटे सांगून त्याने वैजंताबाईंना कारमध्ये बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात त्यांना फिरवून दागिन्यांची मागणी केली.

धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर त्याने रुमालाने गळा आवळून वैजंताबाईंची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दुसऱ्या दिवशी कानळदा फाट्याजवळील सिमेंटच्या चारीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी कानळदा फाट्याजवळून वैजंताबाईंचा मृतदेह हस्तगत केला. आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याचे सांगितले असून, उर्वरित दागिने फागणे परिसरात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.

या प्रकरणी सुरुवातीला BNS कलम १३७ (२) आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खून आणि पुरावा नष्ट केल्यासंदर्भातील कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande