
रियाद, 14 सप्टेंबर (हिं.स.)।सौदी अरेबियाला ड्रोन हल्ल्यांमुळे बाधित झालेली एक महत्त्वाची तेल पाइपलाइन पुन्हा सुरू करता आली नाही, तर निर्यातीसाठीचा त्याचा तेलसाठा अवघ्या काही दिवसांत संपुष्टात येऊ शकतो. सौदी तेल खरेदीदार आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, या नुकसानीमुळे जागतिक तेल पुरवठ्यातील सुमारे ४ टक्के हिस्सा बाजारातून कमी होऊ शकतो.
सौदी तेलाच्या शिपमेंटची माहिती असलेल्या तीन उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाकडे लाल समुद्रावरील यान्बू बंदरातून आणखी केवळ पाच ते सात दिवस निर्यात सुरू ठेवता येईल, एवढाच कच्च्या तेलाचा साठा आहे. पाइपलाइन बंद राहिल्यास हा साठाही अखेर संपुष्टात येऊ शकतो. ड्रोन हल्ल्यांमुळे पाइपलाइनचा मार्ग खराब झाल्यानंतर शुक्रवारी ईस्ट-वेस्ट पाइपलाइन बंद करण्यात आली होती. ही पाइपलाइन सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील तेलक्षेत्रांमधून लाल समुद्रावरील यान्बू बंदरापर्यंत कच्चे तेल पोहोचवते. सौदी अरेबियाने पाइपलाइनचे किती नुकसान झाले आहे किंवा ती पुन्हा कधी सुरू होऊ शकते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
अहवालात नमूद केलेल्या सूत्रांच्या मते, दुरुस्तीला लागणाऱ्या कालावधीबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका सूत्राने दुरुस्तीला पाच ते सहा आठवडे लागू शकतात, असे सांगितले, तर दुसऱ्या सूत्राने पाइपलाइनची दुरुस्ती लवकर होऊ शकते, असे म्हटले आहे. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पाइपलाइनमधून अंशतः तेलपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यताही आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने आणि ऊर्जा मंत्रालयाने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सौदी अरेबियासमोर पुरवठ्याचे संकट अधिक गंभीर होत आहे. युद्धाच्या काळात ही पाइपलाइन सौदी अरेबियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या पाइपलाइनमुळे जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदाराला होर्मुझ सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यापासून बचाव करण्यास मदत झाली आहे. सौदी अरेबिया या मार्गाचा वापर करून दररोज सुमारे ४० लाख बॅरल तेल यान्बूपर्यंत पोहोचवत होता. हे प्रमाण जागतिक तेल पुरवठ्याच्या सुमारे ४ टक्के आहे. पाइपलाइन बंद झाल्यामुळे आता या पर्यायी मार्गावरही संकट निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode