
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या नेपाळच्या मदतीसाठी भारताने वीज निर्यात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्युत मंत्रालयाने नेपाळ विद्युत प्राधिकरणाला १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज १८ तास वीज निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, मुजफ्फरपूर-ढालकेबर ४०० केव्ही डीसी लाईनच्या माध्यमातून नेपाळला जास्तीत जास्त ६०० मेगावॅट वीजपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय टनकपूर-महेंद्रनगर १३२ केव्ही एस-सी लाईनद्वारे ५४ मेगावॅटपर्यंत वीज पाठविली जाणार आहे.
मंत्रालयाने सांगितले की, जानेवारी २०२७ पासून वीज निर्यातीचे प्रमाण आणि वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेचा आढावा डिसेंबर २०२६ मध्ये घेतला जाईल. त्यामुळे नेपाळची विजेची गरज आणि उपलब्धता लक्षात घेऊन पुढील व्यवस्था निश्चित करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, अलीकडेच नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जलविद्युत पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे देशातील वीज उत्पादनावर परिणाम झाला असून, वीज संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येणारा अतिरिक्त वीजपुरवठा नेपाळच्या तातडीच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करणार आहे. विद्युत मंत्रालयाने म्हटले आहे की, संकटाच्या परिस्थितीत नेपाळला आवश्यक ऊर्जा सहाय्य उपलब्ध करून देण्याबरोबरच दोन्ही देशांमधील विश्वासार्ह आणि दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताने प्रादेशिक सहकार्य तसेच शेजारी देशाला सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याच्या आपल्या बांधिलकीचाही पुनरुच्चार केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule