
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। हिंगोली शहरातील जवाहर रोडवरील जैन मंदिरासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून तब्बल तीन लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशात तपासाची चक्रे फिरवत 4 संशयित आरोपी निष्पन्न केले असून, चोरीच्या रकमेपैकी दोन लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोपानराव टाले हे मुथूट फायनान्समधील गोल्ड लोन बंद करण्यासाठी जवाहर रोडवरील जैन मंदिरासमोर कार उभी करून कार्यालयात गेले होते. काही वेळाने ते परत आल्यानंतर कारच्या दरवाज्याची काच फोडण्यात आल्याचे आणि कारमधील तीन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रीणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन कारवाई केली.
या कारवाईत चोरीच्या रकमेपैकी दोन लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासामुळे कारची काच फोडून रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वसंत आरसेवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis