
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. या भव्य चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याच्या प्रदर्शनासोबतच प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचं नवं पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. हे पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
‘रामायण’ या भव्य चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. चित्रपटातील ‘जय जय राम’ या गाण्याला संगीत क्षेत्रातील दिग्गज ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. तर अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल या लोकप्रिय पार्श्वगायकांनी आपल्या आवाजाने हे गाणं सजवलं आहे. निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती दिली. गाणं प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाच्या संगीताबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘रामायण’मध्ये मोठी आणि दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून, साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल राजा दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. निर्मात्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कथा दोन भागांत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर ६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ऑक्टोबर २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाच्या संगीताचीही सध्या मोठी चर्चा आहे. ऑस्कर विजेते हंस झिमर आणि ए. आर. रहमान यांनी ‘रामायण’च्या संगीतावर काम केलं आहे. त्यामुळे ‘जय जय राम’नंतर चित्रपटातील इतर गाणी कशी असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. चित्रपटाचा भव्यपणा, कलाकारांची निवड, संगीत आणि अत्याधुनिक निर्मिती यामुळे ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या पोस्टर, गाणी आणि इतर झलकांना मिळणारा प्रतिसाद पाहता ‘रामायण’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule