
लातूर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एका तरुणाला अटक केली. या कारवाईत १ हजार सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक लातूर शहर परिसरात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावरून ऑटोमधून विनापरवाना देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मांजरा आयुर्वेदिक कॉलेजच्या गेटसमोरील रस्त्यावर सापळा रचला. रात्री सुमारे ९.१० वाजता संशयित ऑटो येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव ऋषीकेश बालाजी गायकवाड (वय २३, रा. बौद्ध नगर, लातूर) असे सांगितले.
ऑटोची झडती घेतली असता खाकी रंगाच्या बॉक्समध्ये ९० एम.एल. क्षमतेच्या विविध कंपन्यांच्या देशी दारूच्या एकूण १ हजार सीलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यामध्ये जी.एम. डॉक्टर देशी दारूच्या ५०० बाटल्या, असली धार संत्रा देशी दारूच्या २०० बाटल्या आणि टँगो पंच देशी दारूच्या ३०० बाटल्यांचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बजाज कंपनीच्या ऑटो क्रमांक एमएच-२४-एटी-०९४९ची अंदाजे किंमत ९० हजार रुपये आहे. असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळसुरे यांच्या फिर्यादीवरून ऋषीकेश बालाजी गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५(अ)(ई) अन्वये गांधी चौक पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे आणि प्रविण कोळसुरे यांच्या पथकाने केली.
लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात यापुढेही प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis