मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला
एकट्याने मुंबईकडे कूच करण्याची घोषणा, समर्थकांना गावातच राहण्याचे आवाहन मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी परवानगी मागितलेला दुसरा अर्जही सोमवारी पोलिसांनी फेटाळून लाव
Manoj Jarange Patil protest at Azad Maidan


एकट्याने मुंबईकडे कूच करण्याची घोषणा, समर्थकांना गावातच राहण्याचे आवाहन

मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी परवानगी मागितलेला दुसरा अर्जही सोमवारी पोलिसांनी फेटाळून लावला. त्यानंतर जरांगे यांनी मंगळवारी एकट्याने मुंबईकडे कूच करणार असल्याचे सांगितले. त्यांनी समर्थकांना तूर्तास ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्याचे आणि आपापल्या गावांमध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. योग्य वेळ आल्यावर मराठा समाजाला मुंबईत बोलावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी जरांगे यांच्या वतीने आझाद मैदान पोलिस ठाण्यात उपोषणासाठी परवानगी मागणारा अर्ज देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी रविवारी हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी नवीन अर्ज देण्यात आला. या अर्जात जरांगे आता केवळ पाच ते दहा कार्यकर्त्यांसोबत उपोषण करणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी दुसरा अर्जही फेटाळून लावला.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचे सांगितले. केवळ ज्या मागण्या कायदेशीर चौकटीत येत नाहीत, त्याच मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी १७वा दिवस आहे. मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतलेला नसून, आपण ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक असणार नाहीत. दोन कार आणि दोन रुग्णवाहिकांसह आपण मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गात कोणत्याही वाहनात बिघाड झाल्यास अडचण येऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

जरांगे म्हणाले, “उद्या सकाळी ११ वाजता आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला जाणार नाही. यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही. मला ठरलेल्या मार्गाने मुंबईला जायचे आहे. माझ्यासोबत दोन रुग्णवाहिका असतील आणि दहा लोकांपेक्षा अधिक लोक नसतील.”

सलाईन आणि पाण्यामुळे आपल्याला त्रास होत आहे, असे जरांगे यांनी सांगितले. मात्र, तरीही त्यांनी एकट्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण एकट्याने मुंबईला जात असताना सरकार आपल्याला मुंबईला जाण्याची परवानगी देणार आहे का, असा सवालही त्यांनी सरकारला केला. जरांगे यांनी राज्य सरकारवर सणांच्या आडून मराठा आंदोलन रोखण्याची रणनीती आखल्याचा आरोप केला. सरकारचा कथित प्रयत्न हाणून पाडणार असून, एकट्याने मुंबईला जाऊन आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे यांनी समर्थकांनी मंगळवारी मुंबईच्या दिशेने येऊ नये आणि आपापल्या गावांमध्ये सुरक्षित राहावे, असे सांगितले. आंदोलनासाठी ज्या रेल्वे आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे, ती तूर्तास थांबवून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास योग्य वेळी समाजाला मुंबईत बोलावले जाईल, असे जरांगे यांनी सांगितले. समर्थकांना त्रास होऊ नये, यासाठी आपण आपला निर्णय बदलला आहे; मात्र याचा अर्थ आंदोलनातून माघार घेतली आहे, असा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande