
तडीपार कारवाईसह २ हजार १६२ जणांना प्रतिबंधात्मक नोटिस
परभणी, 14 सप्टेंबर (हिं.स.)। श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर आळा बसावा, यासाठी परभणी जिल्हा पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ८७५ जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) मधील कलम १२६, १२८ व १२९ अन्वये करण्यात आली आहे. याशिवाय संभाव्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर भूमिका घेत १९५ जणांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बीएनएसएस कलम १६३, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६, ५७ तसेच एमपीडीए अन्वये कारवाईचा समावेश आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २ हजार १६२ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बीएनएसएस कलम १६८ अन्वये या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी परभणी जिल्हा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis