
जळगाव, १४ सप्टेंबर (हिं.स.) : खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. गाडी क्रमांक ०४१५५/०४१५६ उधना–सुबेदारगंज विशेष रेल्वेच्या सेवेचा कालावधी आणखी वाढविण्यात आला असून, आता ही विशेष गाडी २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणखी काही काळ या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.
गुजरातमधील उधना आणि उत्तर प्रदेशातील सुबेदारगंज यांना जोडणारी ही रेल्वे खान्देशातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरत आहे. या गाडीला नंदुरबार, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे असल्याने जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील अनेक प्रवाशांना या सेवेचा फायदा होत आहे. मात्र, या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उपलब्ध वेळापत्रकानुसार, उधना ते सुबेदारगंज हे अंतर सुमारे १,४३७ किलोमीटर असून, प्रवासाचा नियोजित कालावधी सुमारे २८ तास ४५ मिनिटांचा आहे. उधना येथून ही विशेष रेल्वे दुपारी ४.१५ वाजता रवाना होते. नंदुरबार येथे सायंकाळी ६.३० वाजता पोहोचल्यानंतर दहा मिनिटांच्या थांब्यानंतर गाडी पुढे रवाना होते.
अमळनेर येथे रात्री ७.५७ वाजता गाडीचे आगमन होते आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढे जाते. त्यानंतर धरणगाव येथे रात्री ८.२५ वाजता आगमन होऊन ८.२७ वाजता गाडी पुढील प्रवासाला रवाना होते. भुसावळ स्थानकावर रात्री १०.१५ वाजता गाडी पोहोचते. पाच मिनिटांच्या थांब्यानंतर ती सुबेदारगंजच्या दिशेने रवाना होते.
या विशेष रेल्वेला व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, झाशी, ओरई, पोखरायन, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. विशेष रेल्वेचा कालावधी वाढविण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर