इराण-ओमान चर्चेदरम्यान होर्मुझमध्ये जहाजावर हल्ला; इराण- आखाती देशांची बैठक स्थगित
तेहरान, 14 सप्टेंबर (हिं.स.)।इराण आणि आखाती देशांमध्ये सोमवारी ओमानमध्ये प्रस्तावित करण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, काही प्रादेशिक देशांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, इराणच्या पररा
इराण-ओमान यांच्यातील चर्चेदरम्यान होर्मुझमध्ये जहाजावर हल्ला; इराण- आखाती देशांची बैठक स्थगित


तेहरान, 14 सप्टेंबर (हिं.स.)।इराण आणि आखाती देशांमध्ये सोमवारी ओमानमध्ये प्रस्तावित करण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, काही प्रादेशिक देशांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या देशांनी बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती, हे स्पष्ट केले नाही.

ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अल-बुसैदी यांनीही समाजमाध्यम ‘एक्स’वर बैठक स्थगित झाल्याची माहिती दिली. ही बैठक ओमानमधील सलालाह शहरात होणार होती. प्रादेशिक सहमतीच्या हितासाठी बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ओमान या प्रदेशात स्थैर्य आणि दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या चर्चेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीचा मुख्य अजेंडा होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत संभाव्य व्यवस्था निर्माण करण्यावर चर्चा करणे हा होता. इराण आणि ओमान गेल्या काही महिन्यांपासून या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जहाजांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांबाबत द्विपक्षीय चर्चा करत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूच्या किनारपट्टीवर ओमानचे नियंत्रण आहे. यापूर्वी या चर्चांना इतर आखाती अरब देशांचाही पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले होते. प्रस्तावित व्यवस्थेबाबत प्रादेशिक देशांना माहिती देण्याची इराणची योजना होती.

बैठक स्थगित होण्याच्या काही तास आधी होर्मुझ सामुद्रधुनीतील क़ेश्म बेटाजवळ एका इराणी मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याची बातमी समोर आली. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ब्रिटनच्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स मॉनिटरनेही सांगितले की, सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका जहाजाचे प्रक्षेपास्त्रामुळे नुकसान झाले आणि त्याला भीषण आग लागली. मात्र, हेच जहाज इराणने उल्लेख केलेले जहाज होते की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकी लष्कराकडून या घटनेवर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देण्यास नकार दिला. एका आखाती अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने इराण आणि ओमानदरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या करारात काही बदल सुचवले आहेत. या कराराचा होर्मुझ सामुद्रधुनीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आखाती सहकार्य परिषद अर्थात जीसीसीमधील इतर देशांच्या हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो, अशी सौदी अरेबियाला भीती आहे.

बैठकीपूर्वी केवळ इराकने सार्वजनिकरित्या बैठकीत सहभागी होण्याची पुष्टी केली होती. तर बहरीनने तेहरानसोबत राजनैतिक संबंध नसल्याचे कारण देत बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता.इराणने यापूर्वीच संकेत दिले आहेत की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याची व्यवस्था त्याला हवी आहे. तेहरानचे म्हणणे आहे की, फारसच्या आखातात जाणारी सागरी वाहतूक इराणच्या जलक्षेत्रातून जाईल, तर बाहेर जाणाऱ्या जहाजांचा मार्ग काही भागात इराणच्या आणि काही भागात ओमानच्या जलक्षेत्रातून जाऊ शकतो. दरम्यान, या प्रदेशातील सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांची वाहतूक अद्याप कमी आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

याचदरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. दोन्ही बाजूंनी परस्पर चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच भविष्याकडे पाहत एकत्रितपणे पुढे जाण्याच्या शक्यतांवर विचारविनिमय केल्याचे त्यांनी सांगितले. पेझेश्कियान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद यांची भेट घेतली. इराण आणि आखाती देशांमध्ये प्रादेशिक तणाव कायम असताना ही चर्चा झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande