व्हेनेझुएलाप्रमाणे इराणचे तेल आपल्याकडे ठेवू- ट्रम्प
वॉशिंग्टन, 14 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी संकेत दिले की, युद्ध संपल्यानंतरही अमेरिका इराणच्या आसपास आपली उपस्थिती कायम ठेवू शकतो आणि इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवू शकतो. ट्रम्प यांनी याची तुलना व्हे
व्हेनेझुएलाप्रमाणे इराणचे तेल आपल्याकडे ठेवू- ट्रम्प


वॉशिंग्टन, 14 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी संकेत दिले की, युद्ध संपल्यानंतरही अमेरिका इराणच्या आसपास आपली उपस्थिती कायम ठेवू शकतो आणि इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवू शकतो. ट्रम्प यांनी याची तुलना व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिकेच्या भूमिकेशी केली.

आयर्लंड दौऱ्यादरम्यान आयरिश ओपन गोल्फ स्पर्धेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका अखेरीस इराणमधून बाहेर पडेल; मात्र गरज पडल्यास अमेरिका तिथे थांबून ‘व्हेनेझुएलाप्रमाणे तेल आपल्याकडे ठेवू शकते.’ ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अद्याप इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.ट्रम्प यांनी सांगितले की, इराणसोबतचे युद्ध ‘मध्यावधी निवडणुकांनंतर, कदाचित त्याआधीच’ संपेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यांचा संदर्भ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांकडे होता.

इराणकडून अमेरिकेशी सातत्याने संपर्क साधला जात असून करारासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, अमेरिकेच्या अटी आणि मागण्यांनुसार असलेला करारच वॉशिंग्टन स्वीकारेल, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘आपल्याला योग्य करार करावा लागेल,’ असे ट्रम्प म्हणाले. तसेच ‘चांगला करार’ नसलेला कोणताही करार आपण स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी ही टिप्पणी अशा वेळी केली आहे, जेव्हा सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत, तर अमेरिकेत डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचून प्रति गॅलन ६.२० डॉलरपेक्षा अधिक झाल्या आहेत.युद्ध संपताच अमेरिकेतील पेट्रोलच्या किमती ‘खडकासारख्या वेगाने खाली येतील’, असा दावा ट्रम्प यांनी केला.

इराणबाबत ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या अलीकडील लष्करी कारवाईशीही जोडला जात आहे. अमेरिकेने ३ जानेवारी रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले होते. वृत्तानुसार, या कारवाईची अनेक महिने तयारी करण्यात आली होती. अमेरिकी विशेष दलांनी या कारवाईची व्यापक रंगीत तालीम केली होती. यासाठी मादुरो यांच्या सुरक्षित ठिकाणाची प्रतिकृती तयार करून सराव करण्यात आला होता. मादुरो यांच्या हालचालींबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सीआयएनेही अमेरिकी दलांना मदत केली होती.

ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे आता अमेरिका इराणच्या बाबतीतही व्हेनेझुएलासारखे आर्थिक मॉडेल स्वीकारण्याचा विचार करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ इराणमधील अमेरिकी उपस्थिती केवळ सुरक्षा आणि लष्करी उद्दिष्टांपुरती मर्यादित राहणार नाही, तर इराणच्या विशाल तेलसाठ्यांवर आणि ऊर्जा संसाधनांवर प्रवेश मिळवणे हेदेखील अमेरिकी रणनीतीचा भाग बनू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande