
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी नवी दिल्लीत होणार आहे. भारतीय संघाला आधीच मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाला आहे. तो तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी तो भारतीय संघात होता.
वरुण या महिन्याच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात आहे. पण त्याच्या दुखापतीमुळे आता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याचा सहभाग कठीण झाला आहे. यापूर्वी जुलैमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान वरुणला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि तो नुकताच त्यातून सावरला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वरुणने चार षटकांत १६ धावा देऊन एक बळी घेतला होता.
वरुणला पुन्हा दुखापत झाली असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकेटपटूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (सीओई) दुखापत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि वरुण आता त्याचे ताजे उदाहरण ठरला आहे. आशियाई खेळ १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत आणि तोपर्यंत वरुण तंदुरुस्त होईल की नाही, हे पाहणे बाकी आहे.
वरुणने टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी ४९ सामने खेळले असून, १७.३४ च्या सरासरीने आणि ७.५८ च्या इकॉनॉमी रेटने ७५ बळी घेतले आहेत. तो या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा एक महत्त्वाचा क्रिेकेटपटू म्हणून उदयास आला आहे. २०२४ आणि २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता. मात्र, त्याचा अलीकडील फॉर्म चिंताजनक असून, त्याची तंदुरुस्ती आणखी समस्या निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे