
जिल्हाधिकारी कार्यालयात १८ सप्टेंबरला विशेष कक्ष
उमेदवारांसह विविध घटकांना सहभागाचे आवाहन
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी आपल्या सूचना, शिफारशी, हरकती आणि अभिप्राय द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील उच्चस्तरीय समितीच्या पुढाकाराने १८ सप्टेंबर रोजी विभागातील आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत या कक्षामध्ये नागरिक आणि संबंधित घटकांना आपल्या सूचना, शिफारशी, हरकती तसेच अभिप्राय नोंदविता येणार आहेत.
भरती प्रक्रियेतील विविध बाबींवर आपले मत मांडण्यासाठी संबंधितांनी विशेष कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी स्वरूपातील अभिप्राय संबंधित ई-मेलवर पाठविता येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती नागरिक तसेच संबंधित घटकांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. शासकीय भरती प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचना व अभिप्राय महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यातून भरती प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यास मदत होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis