
द्योजक व गुंतवणूकदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासह उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांच्या वतीने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पुढील आठवड्यात होणाऱ्या या परिषदेत जिल्ह्यातील उद्योजक व गुंतवणूकदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे.
उद्योग मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार आहे. परिषदेदरम्यान विविध उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील गुंतवणुकीला चालना देणे, स्थानिक उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यासह राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
परिषदेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रे, गुंतवणुकीच्या उपलब्ध संधी, उद्योजकांचे अनुभव कथन तसेच उद्योग क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
याशिवाय विविध उद्योग घटकांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक व गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेसंदर्भात अधिक माहिती किंवा सहभाग नोंदविण्यास अडचण असल्यास अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis