ऊर्जा बचत ही काळाची गरज - गणेश चाकूरकर
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ऊर्जा बचत ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरापासून ऊर्जा बचतीची सुरुवात करावी. सौरऊर्जेच्या वापरामुळे वीजबचतीसोबत आर्थिक बचत आणि पर्यावरण संवर्धन साध्य होते, असे प्रतिपादन महावितरणचे कार्य
अ


परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ऊर्जा बचत ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरापासून ऊर्जा बचतीची सुरुवात करावी. सौरऊर्जेच्या वापरामुळे वीजबचतीसोबत आर्थिक बचत आणि पर्यावरण संवर्धन साध्य होते, असे प्रतिपादन महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश चाकूरकर यांनी केले.

नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेत मंगळवार 15 सप्टेंबर रोजी महावितरणतर्फे विद्युत सुरक्षा आणि सौरऊर्जेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव तथा मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक-प्राचार्य अनंत पांडे होते. यावेळी महावितरणचे गजानन क्षीरसागर, शाळेचे पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील आणि सहपर्यवेक्षक सुनील रामपूरकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गोपाल रोडे यांनी केले.

मार्गदर्शन करताना चाकूरकर यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. विद्युत उपकरणे वापरताना खबरदारी घेणे, ओल्या हाताने स्विच किंवा प्लगला स्पर्श न करणे, तुटलेल्या अथवा उघड्या तारांपासून दूर राहणे, तसेच विद्युत खांब आणि रोहित्राजवळ खेळू नये, असे त्यांनी सांगितले. विद्युत दुर्घटना किंवा धोकादायक परिस्थिती निदर्शनास आल्यास तातडीने मोठ्यांना तसेच महावितरणला माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. सौरऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी उपयुक्त ऊर्जा असून तिच्या वापराबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात पांडे यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे दैनंदिन जीवनात पालन करण्याचे आवाहन केले. दक्षता घेतल्यास अनेक विद्युत अपघात टाळता येतात. विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून ऊर्जा संवर्धनात योगदान द्यावे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले. शिस्त, नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखत विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास नववी व दहावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्युत सुरक्षेबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून सौरऊर्जेच्या वापराबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande