
लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन करावे आणि घरकुलाचे अनुदान कोणत्याही विलंबाशिवाय दिले जाईल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांच्या लाभार्थी वयोवृद्ध व्यक्तींच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामात येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. सध्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, तसेच पोषण आहाराच्या बाबतीत सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही. बी. जी. राम जी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकही अंगणवाडी इमारतीविना राहू नये आणि सर्व अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळावी, यासाठी जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण हा बालकांच्या शिक्षण व पोषणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर भुयारी गटार योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही. बी. जी. राम जी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता अवैध पाणी उपसा रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका, महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्त पथक स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा त्यांनी दिल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis