
वाघाच्या हल्ल्यात मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
वर्धा, 15 सप्टेंबर (हिं.स.) : सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना न्याय आणि योग्य मदत मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलन सुरू असतानाच प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कथित हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आंदोलनस्थळी आल्यास कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या नोटिसा रात्रीच्या सुमारास ग्रामस्थांच्या घरांवर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भगवान धुर्वे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला आर्थिक तसेच सामाजिक आधाराची गरज आहे. त्यामुळे धुर्वे यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत मिळावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गाव परिसरात ठोस सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी रायपूर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी मंगळवारी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आंदोलनस्थळी ग्रामस्थ आल्यास त्यांच्यावर कलम १६८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारे पत्रक रात्रीच्या वेळी रायपूर येथील ग्रामस्थांच्या घरांवर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी कारवाईची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे रायपूर येथील आंदोलनाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासन आता या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी