
वर्धा, 15 सप्टेंबर (हिं.स.) : सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशीही कायम आहे. कुटुंबीयांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने धुर्वे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
भगवान धुर्वे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मदत मिळावी तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदार अमर काळे हे गेल्या सहा दिवसांपासून कुटुंबीयांसोबत आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले असून मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे.
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी रायपूर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मागण्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासन नियमानुसार मदतीची प्रक्रिया सुरू
दरम्यान, जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली होती. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामस्तरीय समिती, स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी प्रशासन सातत्याने संवाद साधत असून, ग्रामस्थांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाकडून कुटुंबातील एका व्यक्तीला कंत्राटी वाहनचालक किंवा वनमजूर म्हणून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी