
सर्वसामान्यांच्या सुख-समाधानासाठी केली प्रार्थना
लातूर, १५ सप्टेंबर (हिं.स.)। श्री गणेशोत्सवानिमित्त उदगीर शहरातील परकट्टी गल्ली येथील मानाच्या श्री आजोबा गणपतीच्या चरणी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी विधिवत महाआरती केली. यावेळी त्यांनी श्री गणरायाच्या चरणी माथा टेकवत शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समाधानासाठी तसेच चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री आजोबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व आरतीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी शहरातील श्री आजोबा गणपती, नवयुवक व्यापारी गणेश मंडळ आणि श्रीमंत व्यापारी गणेश मंडळांना भेटी दिल्या. विविध गणेश मंडळांच्या गणरायाची आरती करून त्यांनी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समाधानासाठी आणि समाधानकारक पावसासाठी श्री गणरायाच्या चरणी साकडे घातले.
सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देणारा उत्सव’
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने उदगीर-जळकोट मतदारसंघासह संपूर्ण परिसराच्या विकासाला अधिक गती मिळावी, नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समाधान नांदावे, अशी भावना आमदार संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
महाआरतीनंतर उपस्थित भाविकांनी आमदार संजय बनसोडे यांच्यासोबत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उदगीर शहरात गणेशभक्तीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis