
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे. रविवारी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जातून 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करण्यात येईल. तसेच, 18 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, असे नव्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. आज दुपारपर्यंत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मनोज जरांगे पाटील न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5 हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.यंदा 14 सप्टेंबरपासून मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील परिस्थिती संवेदनशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याशिवाय, आझाद मैदानाच्या उपलब्ध जागेचीही मर्यादा आहे. नियम 2025 नुसार सुमारे 7 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आझाद मैदानात कमाल 5 हजार आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासन आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis