भारतीय किसानसंघातर्फे जिंतूर तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा
पंचनाम्याची अट रद्द करूव हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट किमान हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई कोणताही पंचनामा न करता तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी खते व बियाणे विना
अ


पंचनाम्याची अट रद्द करूव हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट किमान हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई कोणताही पंचनामा न करता तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी खते व बियाणे विनाशुल्क उपलब्ध करून द्यावेत, तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने मंगळवारी (दि. १५) जिंतूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.

चालू वर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तालुक्यातील खरीप पिके पावसाअभावी सुकून गेली आहेत. आगामी रब्बी हंगामाचीही स्थिती अनिश्चित असल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.

ई-पिक पाहणी पूर्ववत करण्याची मागणी

ई-पिक पाहणी कृषिमित्रांमार्फत करण्यात येत असल्याचे शासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही पाहणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप भारतीय किसान संघाने केला. त्यामुळे ई-पिक पाहणी पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांनाच करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय मागील वर्षातील प्रलंबित पीकविमा तातडीने वितरित करावा, कर्जमाफी योजनेतील शेतकरीविरोधी त्रुटी दूर कराव्यात, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची मागणी

भविष्यात दुष्काळसदृश परिस्थिती टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्पांसारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार करून ओढे-नाले रुंदीकरण व खोलीकरणाची कामे हाती घ्यावीत. पाणी अडवा, पाणी जिरवा या माध्यमातून जलसाठे निर्माण करण्यावर शासनाने भर द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष नवनाथ जगताप, अध्यक्ष मोहन आडे, तालुकामंत्री विठ्ठल थिटे, जिल्हा कोषाध्यक्ष बळवंत कौसडीकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भूमिका मांडली.

दरम्यान, या मोर्चाला भारतीय किसान संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते पद्मश्री दादा लाड आणि ऍड. सुभाषराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande