
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मोठ्या फेरबदलाच्या तयारीत असून, अध्यक्ष मोहसिन नक्वी येत्या काही दिवसांत काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रीय निवड समितीत बदल आणि माजी कसोटी क्रिकेटपटू आकिब जावेद यांना वरिष्ठ निवडकर्ता पदावरून हटवण्याचा समावेश आहे. आणखी एक माजी पाकिस्तानी कसोटी खेळाडू, वहाब रियाझ यांनाही आशियाई खेळांनंतर राष्ट्रीय महिला संघाच्या मार्गदर्शक पदावरून आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसह हटवले जाण्याची शक्यता आहे. ते गेल्या वर्षापासून या भूमिकेत आहेत.
पाकिस्तान क्रिकेटमधील पराभवाची मालिका आणि अचानक घडलेल्या घटनांना संपवण्यासाठी काही मोठी पावले उचलणे आवश्यक आहे, हे मोहसिन नक्वी यांच्या आता लक्षात आले आहे, त्यामुळे हे बदल आता शक्य आहेत. गेल्या दोन वर्षांत पीसीबीने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या क्रिकेट निर्णयांमध्ये आकिब यांना प्रमुख व्यक्ती मानले जाते, ज्यात दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंड दौऱ्यादरम्यान पाकिस्तान संघ आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्याच्या वादग्रस्त निर्णयाचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील या गोंधळासाठी माजी पाकिस्तानी कसोटी गोलंदाजाला मोठ्या प्रमाणावर जबाबदार धरले जात आहे. आणि त्यामुळचे प्रशिक्षक आणि कर्णधारपदात वारंवार बदल झाले आहेत.
मर्यादित षटकांच्या सामन्यांचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत दिल्याने, पीसीबीने निवड आणि इतर क्रिकेट-संबंधित बाबींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले नक्वी महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यासाठी दुबईत होते. या स्पर्धेदरम्यान आणखी एक वाद निर्माण झाला. भारतीय संघाने त्यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. दुबईत २०२५ मध्ये झालेल्या पुरुष आशिया कपच्या अंतिम सामन्यावेळी झालेल्या वादाची ही पुनरावृत्ती होती. त्यावेळी भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे