जायकवाडीतील पाण्याच्या असमान वितरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.) : पाथरी तालुक्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत जायकवाडी उपविभागाच्या कालवा क्रमांक ५९ मधून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शिवाराऐवजी ओढ्या-नाल्यांतून वाहून ज
अ


परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.) : पाथरी तालुक्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत जायकवाडी उपविभागाच्या कालवा क्रमांक ५९ मधून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शिवाराऐवजी ओढ्या-नाल्यांतून वाहून जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सुरुवातीच्या गावांतील चाऱ्या गेल्या १८ दिवसांपासून सुरू असताना शेवटच्या गावांतील शिवारात अद्याप पाणी पोहोचलेले नसल्याने पाणी वितरणाच्या नियोजनावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

तालुक्यात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने हलक्या जमिनीतील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काळ्या जमिनीतील सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊस ही पिकेही पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर बी-५९ चारीला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून महिनाभरापासून करण्यात येत होती. अखेर २९ ऑगस्ट रोजी या चारीला पाणी सोडण्यात आले. मात्र, पाण्याचे समन्यायी वितरण न झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

देवनांद्रा येथून पाणी सोडल्यानंतर रामपुरी, ढालेगाव, पोहेटाकळी, तुरा, गुंज, कानसूर आणि लिंबा मायनर या चाऱ्या गेल्या १८ ते २० दिवसांपासून सुरू आहेत. परिणामी काही शेतांमध्ये चार-चार वेळा पाणी पोहोचले असून अतिरिक्त पाणी ओढ्या-नाल्यांतून वाहून जात असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, वझूर, वांगी आणि विटा या शेवटच्या गावांच्या शिवारात अद्याप पाण्याचा थेंबही पोहोचलेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘दोन दिवसांत पाणी सोडतो’चे आश्वासन

पाणी वितरणाबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, गेल्या महिनाभरापासून ‘दोन दिवसांत पाणी सोडतो’, असे उत्तर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही कर्मचाऱ्यांकडून ‘हे पाणी नियोजनात नाही, आम्ही काही करू शकत नाही’, अशी उत्तरे दिली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

उपविभागाच्या उपअभियंत्यांच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे अन्य ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले जात असून, कालव्यावर नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष चाऱ्यांवर उपस्थित राहत नसल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि समन्यायी वितरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

एका बाजूला पाण्याचा अपव्यय, दुसरीकडे प्रतीक्षा

काही जागरूक शेतकरी स्वतःहून फोन करून ‘आमचे क्षेत्र पुरेसे भिजले आहे, पाणी बंद करा’, अशी विनंती करीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे एका बाजूला पाण्याचा अपव्यय होत असताना दुसऱ्या बाजूला शेवटच्या टोकावरील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पाण्याच्या असमान वितरणामुळे शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद निर्माण होण्याची शक्यता असून, भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जायकवाडी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुरुवातीच्या चाऱ्या बंद कराव्यात, प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे समन्यायी नियोजन करावे आणि कालवा क्रमांक ५९चे पाणी शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande