
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.) - मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प अध्यक्ष कार्यालयासाठी आणखी चार नवीन पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने निर्माण करण्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात मुंबईतील ७४ भूखंडावर ४० हजार निवासस्थाने उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी प्रकल्प अध्यक्षांच्या कार्यालयाकरिता पाच पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नियोजन विविध सरकारी संस्थांचे समन्वय, आर्थिक व्यवस्थापन आणि कालबध्द अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरिता आणखी चार पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली.
या पदांमध्ये एक उप सचिव, एक अवर सचिव आणि दोन कक्ष अधिकारी अशा पदांचा समावेश आहे. या पदासाठी वार्षिक ६३ लाख ३ हजार १५६ रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासही मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी