लातूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना राबवाव्यात - आ. अमित देशमुख
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असले तरी अद्यापपर्यंत लातूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. सलग दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व खरिप
अमित देशमुख


लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असले तरी अद्यापपर्यंत लातूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. सलग दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व खरिपाची इतर पिके पूर्णत: हातची गेली आहेत. परिणामी शेतकरी, शेतमजूरवर्ग हवालदील झाला आहे. ही दुष्काळसुदृश्य परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने तात्काळ लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून, शेतकरी वर्गाला मदतीचा हात द्यावा, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात अशी अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. त्या प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते. या बैठकीला विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलतांना अमित देशमुख म्हणाले की, एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरला आहे. खरिपाची पिके हातची गेली आहेत. पाणी आणि चारा टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त भागात, शेतकऱ्यांना अनुदान, आणि विमा कंपन्या मार्फत पिक नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, शेतकरी कर्जमाफी योजनेचा विस्तार वाढवावा, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क शासनामार्फत देण्यात यावे, आवश्यकतेनुसार चारा छावण्या आणि टँकर मार्फत पाणीपुरवठा सुरू करावा, ठीक-ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दयावा अशी आग्रही मागणी यावेळी केली आहे.

लातूर शहर भुयारी गटार योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊन अमित देशमुख म्हणाले, भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही.बी. जी.रामजी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योग्य नियोजन करावे आणि घरकुलाचे अनुदान कोणत्याही विलंबाशिवाय दिले जाईल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी करुन राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत योजनांच्या लाभार्थी वयोवृद्ध व्यक्तींच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामात येत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले.

सदया पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषि विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, तसेच पोषण आहाराच्या बाबतीत सर्व आवश्यक निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही.बी.जी.रामजी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकही अंगणवाडी इमारतीविना राहू नये आणि सर्व अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळावी, यासाठी जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण हा बालकांच्या शिक्षण व पोषणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली.

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांना मदतीचा मांडला ठराव

लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. आपण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत. त्यासाठी शासनाने दुष्काळ जाहीर करून योग्य ते पावले उचलावीत तसेच केंद्र सरकारने भरघोस मदत करावी, असा ठराव माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज दिशा समितीच्या बैठकीत मांडला त्याला आमदार विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी तो ठराव मंजूर केला तसेच नदीजोड प्रकल्प लातूर जिल्ह्यात मंजूर करावा हाही ठराव त्यांनी मंजूर केला. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले. या बैठकीचे प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. तर शेवटी आभार जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande