
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.)। सण आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना झटका बसणार आहे. केंद्र सरकारने हॉलमार्किंग शुल्कात वाढ केली आहे. हे सुधारित हॉलमार्किंग शुल्क तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे.
भारतीय मानक ब्युरो (बिआयएस)ने सोने आणि चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग शुल्कात वाढ केली आहे. सोन्यासाठी हे शुल्क ४५ रुपयांवरून वाढवून ७५ रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच शुल्कात सुमारे ६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, चांदीच्या दागिन्यांसाठीचे शुल्क प्रति वस्तू ३५ रुपये इतकेच कायम ठेवण्यात आले आहे. शुल्कवाढीचा निर्णय तत्काळ लागू केल्याबद्दल आभूषण उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे.
हॉलमार्किंग शुल्कातील ही वाढ १४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या बिआयएस (हॉलमार्किंग) सुधारणा विनियम, २०२६च्या माध्यमातून अधिसूचित करण्यात आली आहे. सुधारित अनुसूची चारनुसार ज्वेलर्सना प्रति वस्तू ७५ रुपये हॉलमार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे. आतापर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का लावण्यासाठी ४५ रुपये शुल्क आकारले जात होते.
अधिसूचनेनुसार, एका खेपेसाठी किमान शुल्क २०० रुपये असेल. तर चांदीच्या वस्तूंसाठी मान्यताप्राप्त तपासणी आणि हॉलमार्किंग केंद्रांना (एएचसी) प्रति वस्तू ३५ रुपये शुल्क आकारले जाईल आणि एका खेपेसाठी किमान शुल्क १५० रुपये असेल. हे सुधारित हॉलमार्किंग शुल्क तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. आभूषण उद्योगाने शुल्कात झालेल्या ६७ टक्के वाढीबाबत चिंता व्यक्त करत सरकारकडे या निर्णयाचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)ने सरकार आणि बिआयएसकडे शुल्कवाढीचा तातडीने आढावा घेण्याची तसेच संबंधित घटकांशी चर्चा होईपर्यंत सध्याचे शुल्क कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अनिवार्य अनुपालनाच्या खर्चात सुमारे ६७ टक्क्यांची वाढ कोणत्याही पुनरावलोकनाशिवाय मंजूर केली जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, बिआयएस हॉलमार्किंगद्वारे दागिन्यांमध्ये वापरण्यात आलेल्या मौल्यवान धातूच्या शुद्धतेची खात्री केली जाते. भारतीय मानक ब्युरोअंतर्गत प्रमाणित दागिन्यांवर तीन प्रमुख चिन्हे असतात. यामध्ये बिआयएसचा लोगो (चिन्ह), कॅरेट म्हणजेच मिलिसिमल फायनेस आणि सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) यांचा समावेश असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule