झीरम घाटी हत्याकांड : 10 नक्षलवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा
- काँग्रेस नेते नंदकुमार पटेलांसह 29 जणांची झाली होती हत्या - एनआयए कोर्टात तब्बल 13 वर्षे चालली होती सुनावणी जगदलपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या झीरम घाटी हत्याकांड प्रकरणात जगदलपूर येथील एनआयए विशेष न्यायालयाने 10 दोषींना फाशीची शिक्षा
कोर्टाचा संग्रहित लोगो


- काँग्रेस नेते नंदकुमार पटेलांसह 29 जणांची झाली होती हत्या

- एनआयए कोर्टात तब्बल 13 वर्षे चालली होती सुनावणी

जगदलपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या झीरम घाटी हत्याकांड प्रकरणात जगदलपूर येथील एनआयए विशेष न्यायालयाने 10 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या ताफ्यावर 25 मे 2013 रोजी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह 29 जणांचा मृत्यू झाला होता.विशेष न्यायाधीश अजय सिंह राजपूत यांनी बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता शिक्षा सुनावली.

या प्रकरणाच्या सुमारे 13 वर्षे चाललेल्या सुनावणीदरम्यान 101 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच विविध कागदपत्रे न्यायालयीन नोंदीवर घेण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात या शिक्षेची पुष्टी उच्च न्यायालयाकडून केली जाणार असल्याचे नमूद केले आहे. दोषींना 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे.अभियोजन पक्षाने दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी बचाव पक्षाने शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. विशेष न्यायालयाने गेल्या 5 सप्टेंबर रोजीच्या निर्णयात प्रमिला मोडियाम, सुमित्रा पुनेम, मुक्का मांडवी, मडकामी देवा, कोसा कवासी, आयत मरकाम, बंजामी सेना, चैतू लेकाम, जोगा मडकामी आणि महादेव नागा यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्यांना सात विविध कलमांखाली दोषी ठरवले होते.

नेमका काय होता झीरम घाटी हल्ला ?

बस्तरमध्ये काँग्रेसकडून 13 वर्षांपूर्वी परिवर्तन यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा 25 मे 2013 रोजी सायंकाळी सुकमाच्या दिशेने परतत होती. दरभा परिसरातील झीरम घाटीतून काँग्रेसचा ताफा जात असताना माओवाद्यांनी घात करून हल्ला केला.हल्ल्याची सुरुवात आयईडी स्फोटाने करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर झाडे पाडून मार्ग बंद करण्यात आला आणि जंगलातून ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. काही क्षणांतच संपूर्ण परिसर गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला.माओवाद्यांनी नेते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेगवेगळे केले. या हल्ल्यात महेंद्र कर्मा हे माओवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते. नंदकुमार पटेल, त्यांचे पुत्र दिनेश पटेल आणि अन्य अनेकांचीही हत्या करण्यात आली. या एका हल्ल्यात काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेश नेतृत्वातील अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाला.

हल्ल्याची पूर्वतयारी

झीरम घाटीवरील हा हल्ला अचानक घेतलेला निर्णय नव्हता. या हल्ल्याची तयारी अनेक आठवड्यांपासून सुरू असल्याचे तपासात समोर आले होते.माओवाद्यांची सुरुवातीची योजना सुकमा येथील मिनपा परिसरातील सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला करण्याची होती. फेब्रुवारी 2013 मध्ये बीजापूर जिल्ह्यातील पिडिया गावात झालेल्या बैठकीत ही रणनीती बदलण्यात आली.मिनपाऐवजी दरभा परिसरात हल्ला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय वरिष्ठ माओवादी कमांडर देवजी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याचे प्रकरणातील तपासात नमूद करण्यात आले आहे.---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande