जालना जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीसाठी एफएफएस प्रणाली
शेतकऱ्यांनी ऍपवर नोंदणी व आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : केंद्र शासनाच्या अनुदानित रासायनिक खतांच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी विकसित करण्यात आलेली Framework for Fertilizer S
जालना जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीसाठी एफएफएस प्रणाली


शेतकऱ्यांनी ऍपवर नोंदणी व आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : केंद्र शासनाच्या अनुदानित रासायनिक खतांच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी विकसित करण्यात आलेली Framework for Fertilizer Sale (FFS) ही मोबाईल आधारित प्रणाली जालना जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खत खरेदीपूर्वी एफएफएस प्रणालीवर आवश्यक नोंदणी करून आगाऊ बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, जालना यांनी केले आहे.

सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून ई-पॉस मशीनद्वारे कृषी सेवा केंद्रांवर अनुदानित रासायनिक खतांची विक्री केली जाते. एफएफएस प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची गरज नोंदविता येणार आहे. जमीन क्षेत्र व निवडलेल्या पिकाच्या आधारे General Fertilizer Recommendation (GFR) नुसार खताची शिफारस केलेली मात्रा ॲपवर पाहता येईल. तसेच जवळील उपलब्ध खत विक्रेत्याची निवड करून QR Code आणि Token Number मिळविता येणार आहे.

टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

महाराष्ट्रात एफएफएस प्रणालीची पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. आता तिसऱ्या टप्प्यात जालना जिल्ह्यासह उर्वरित जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपासून ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

शेतकऱ्याकडे फार्मर आयडी उपलब्ध असल्यास एफएफएस ॲपमध्ये राज्याची निवड करून फार्मर आयडी आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करता येईल.

त्यानंतर संबंधित जमीन माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होईल.

फार्मर आयडी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांनाही आधार क्रमांकाच्या आधारे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. जमीन मालकी किंवा कसणाऱ्याची श्रेणी निवडल्यानंतर सर्व्हे क्रमांक, गाव, जिल्हा आणि हेक्टरमधील क्षेत्रफळाची माहिती भरावी लागेल. जमीन माहितीची पडताळणी करून अर्ज सादर करता येईल.

पिकानुसार खताची शिफारस

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधित पीक निवडावे. निवडलेल्या पिकाचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन ॲपमध्ये जीएफआरनुसार खताची शिफारस उपलब्ध होईल. त्यानुसार आवश्यक खताचा प्रकार आणि गोण्यांची संख्या निवडता येईल.

उपलब्धतेनुसार खत विक्रेत्याची निवड करता येणार असून, वेगवेगळी खते वेगवेगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध असल्यास एकापेक्षा अधिक विक्रेते निवडण्याची सुविधाही प्रणालीमध्ये आहे. अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्याला युनिक क्यूआर कोड आणि टोकन नंबर मिळेल. हा क्यूआर कोड मोबाईलमध्ये जतन करून ठेवावा. निवडलेल्या विक्रेत्याच्या दुकानात क्यूआर कोड दाखवल्यानंतर खताची खरेदी करता येईल.

बुकिंगनंतर तीन दिवसांची मुदत

खताची बुकिंग केल्यानंतर क्यूआर कोड किंवा टोकन नंबर प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत रासायनिक खताची खरेदी करणे आवश्यक राहणार आहे.

शेतकऱ्यांनी एफएफएस ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून २५ सप्टेंबरपूर्वी आगाऊ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. फार्मर आयडी उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा. आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असल्याची खात्री करावी. जमीन व पिकाची माहिती अचूक भरून ॲपमध्ये उपलब्ध जीएफआरनुसार खताची आवश्यकता तपासावी.

खत विक्रेत्याची निवड केल्यानंतर प्राप्त झालेला क्यूआर कोड आणि टोकन नंबर जतन करून ठेवावा. शेतकऱ्याच्या वतीने प्रतिनिधी खत खरेदीसाठी जाणार असल्यास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार असून, प्रतिनिधीकडे स्वतःचे आधार कार्ड आणि संबंधित क्यूआर कोड असणे आवश्यक आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध

‘Framework for Fertilizer Sale – Ministry of Agriculture’ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून २५ सप्टेंबरपूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एफएफएस प्रणालीमुळे खत खरेदीसाठी होणारी गर्दी आणि लांब रांगा टाळण्यास मदत होणार असून, जवळच्या विक्रेत्याकडे उपलब्ध खताची माहिती घेऊन आगाऊ नियोजन करता येणार आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे खत वितरणात पारदर्शकता वाढण्यासही मदत होणार आहे.

जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एफएफएस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून खत खरेदीची प्रक्रिया सुलभ व नियोजनबद्ध करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, खत विक्रेते, गुण नियंत्रण निरीक्षक, खत उत्पादक कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये एफएफएस प्रणालीबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक मार्गदर्शन करावे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande