सणासुदीपूर्वी जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी महाग
सोन्याच्या दरात १,५०० तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ जळगाव, १६ सप्टेंबर (हिं.स.) : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत असतानाच जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या मौल्यवान धात
सोने-चांदी लोगो


सोन्याच्या दरात १,५०० तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ

जळगाव, १६ सप्टेंबर (हिं.स.) : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत असतानाच जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या मौल्यवान धातूंच्या दरांनी आज अचानक उसळी घेतल्याने सणासुदीत सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली. या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा जीएसटीसह दर २ लाख ४१ हजार २० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही आज तब्बल २ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकन डॉलरचा दर, स्थानिक मागणी तसेच अन्य आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे आगामी काळात मौल्यवान धातूंचे दर कोणत्या दिशेने वाटचाल करतात, याकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande