
धाराशिव, 16 सप्टेंबर (हिं.स.) । मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या आहेत, असे सांगत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या शेतकरीविषयक भूमिकेचा संदर्भ दिला. “शेतकरी हा मराठवाड्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावर समजून घेऊन चालणार नाही; त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्या समजून घेतल्या पाहिजेत. जरांगे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केलेल्या सूचनेनुसार आता मी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मदतीसाठी प्रयत्न करणार आहे,” अशी भूमिका सरनाईक यांनी व्यक्त केली. १७ सप्टेंबर हा ' मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ' आहे. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल, अशा कोणत्याही कृती टाळण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis