गाझा शहरात भीषण हवाई हल्ले; सात मजली इमारत कोसळून २० जणांचा मृत्यू
जेरुसलेम, 16 सप्टेंबर (हिं.स.)।गाझा शहरात रात्रभर बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ले सुरू होते. या हल्ल्यांमुळे सात मजली इमारत पूर्णपणे कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात पाच मुलांचा समावेश आहे. ही सात मज
गाझा शहरात भीषण हवाई हल्ले; सात मजली इमारत कोसळून २० जणांचा मृत्यू


जेरुसलेम, 16 सप्टेंबर (हिं.स.)।गाझा शहरात रात्रभर बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ले सुरू होते. या हल्ल्यांमुळे सात मजली इमारत पूर्णपणे कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात पाच मुलांचा समावेश आहे. ही सात मजली इमारत ‘तल अल-हवा’ परिसरात कोसळली. ढिगाऱ्याखाली अद्याप १०० हून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या इमारतीत सुमारे १० कुटुंबे राहत होती. इमारत कोसळल्याने १४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत व्यक्तींचा शोध घेत आहेत.

गाझा शहराच्या नागरी संरक्षण सेवेचे संचालक राएड अल-दहशान यांनी सांगितले की, बचाव पथकांना अजूनही ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. माध्यमांना मिळालेल्या एका व्हिडिओमध्ये बचाव पथकातील कर्मचारी कोसळलेल्या भिंतीखालून दोन जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

ढिगारा हटवण्यासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रसामग्री आणि इतर उपकरणेही उपलब्ध नाहीत. त्यातच ढिगाऱ्याखाली लोक अडकले असल्याने बचावकार्य अत्यंत संथ गतीने सुरू आहे. स्थानिक नागरिकही नागरी संरक्षण पथकांना ढिगारा हाताने हटवण्याच्या कामात मदत करत आहेत.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) गाझा कार्यालयाचे प्रमुख अलेस्सांद्रो म्राकिक यांनी सांगितले की, या बचावकार्यात इजिप्तच्या मदत संस्थेसह संयुक्त राष्ट्रांच्या काही संस्थांचे बचाव कर्मचारीही सहभागी आहेत.

म्राकिक म्हणाले, “तुम्ही पाहू शकता की परिस्थिती अत्यंत दुःखद आहे, कारण आमच्याकडे आवश्यक उपकरणे आणि यंत्रसामग्री नाही. त्यामुळे लोक प्रत्यक्ष हाताने ढिगारा हटवत आहेत. आणखी जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्याला तयार राहण्याची गरज आहे.”

म्राकिक यांनी पुढे सांगितले की, सुमारे ४०० इमारती कोसळण्याच्या धोक्यात आहेत. “या इमारती कोसळतील, याची आम्हाला जाणीव आहे. विशेषतः आता हिवाळा जवळ येत असल्याने हा धोका आणखी वाढू शकतो,” असे त्यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande