निच्चांकी पातळीवरील खरेदीने शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत बंद
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.)। एफएमसीजी, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी तसेच व्यापक बाजारात निच्चांकी पातळीवर झालेल्या मूल्याधारित खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या सुरुवातीपासून बाजारात मोठ्या
Stock Market Closing


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.)। एफएमसीजी, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी तसेच व्यापक बाजारात निच्चांकी पातळीवर झालेल्या मूल्याधारित खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या सुरुवातीपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आला. मात्र, त्यानंतर बाजार मर्यादित पातळीत व्यवहार करत राहिला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३२.६३ अंक अर्थात ०.४५ टक्क्यांनी वाढून ७४,३३६.४५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९९ अंक अर्थात ०.४३ टक्क्यांनी वाढून २३,२१७.६० अंकांवर स्थिरावला. बाजारात तेजी असतानाही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ६० हजार कोटी रुपयांची घट झाली.

सेन्सेक्सने बुधवारी २४५.४९ अंकांच्या वाढीसह ७४ हजार २४९.३१ अंकांवर व्यवहाराची सुरुवात केली. सुरुवातीच्या खरेदीमुळे काही वेळातच तो ५०२.०४ अंकांनी वाढून ७४ हजार ५०५.८६ अंकांवर पोहोचला. मात्र, या पातळीवर नफावसुली सुरू झाल्याने सेन्सेक्स ५२४.५३ अंकांनी घसरून ७३ हजार ९८१.३३ अंकांवर आला. त्यानंतर पुन्हा खरेदी वाढल्याने बाजाराने जोरदार पुनरागमन केले. दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्स ७४ हजार ४६४.३० अंकांपर्यंत पोहोचला. अखेर काही प्रमाणात नफावसुली झाल्याने निर्देशांक किंचित खाली आला आणि ३३२.६३ अंकांच्या वाढीसह बंद झाला.

निफ्टीनेही ८३ अंकांच्या वाढीसह २३ हजार २०१.६० अंकांवर व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच तो २३ हजार २८१.१५ अंकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर झालेल्या विक्रीमुळे निफ्टी २३ हजार ११६.१० अंकांपर्यंत घसरला. मात्र, निच्चांकी पातळीवर झालेल्या खरेदीमुळे त्याला पुन्हा आधार मिळाला. दुपारी निफ्टी २३ हजार २८४.७५ अंकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नफावसुलीमुळे तो काहीसा खाली आला आणि अखेर ९९ अंकांच्या वाढीसह २३ हजार २१७.६० अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये एफएमसीजी क्षेत्रात सर्वाधिक उत्साह दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा एफएमसीजी निर्देशांक १.४४ टक्क्यांनी वाढला. याशिवाय ग्राहक टिकाऊ वस्तू, तेल आणि वायू, धातू तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदी झाली. दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि भांडवली वस्तू क्षेत्रावर विक्रीचा दबाव राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक १.५८ टक्क्यांनी घसरला, तर मुंबई शेअर बाजाराचा तंत्रज्ञान निर्देशांक ०.८६ टक्क्यांनी कमजोर झाला.

व्यापक बाजारात निच्चांकी पातळीवर खरेदी झाली असली तरी दबाव कायम राहिला. निफ्टीच्या मध्यम आकाराच्या कंपन्यांचा निर्देशांक ०.०१ टक्क्यांनी, तर लहान कंपन्यांचा निर्देशांक ०.१८ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे बाजारात तेजी असूनही मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ६० हजार कोटी रुपयांनी कमी झाले. मंगळवारी ४७३.६३ लाख कोटी रुपये असलेले बाजार भांडवल बुधवारी ४७३.०३ लाख कोटी रुपयांवर आले.

दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ४ हजार ५६१ समभागांपैकी १ हजार ९७९ समभाग तेजीत, तर २ हजार ३५१ समभाग घसरणीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात ३ हजार २३२ समभागांपैकी १ हजार ४७६ समभाग वाढले, तर १ हजार ७५६ समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १७ समभाग तेजीत, १२ समभाग घसरणीत, तर एक समभाग स्थिर राहिला.

दिग्गज समभागांमध्ये एचडीएफसी लाइफ २.७३ टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स २.६५ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया २.४२ टक्के, आयटीसी २.३८ टक्के आणि नेस्ले १.६५ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे टीसीएस २.७६ टक्के, विप्रो १.८३ टक्के, इन्फोसिस १.५८ टक्के, टेक महिंद्रा १.१४ टक्के आणि लार्सन अँड टुब्रो १.१२ टक्क्यांनी घसरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande